फलटणमधील डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणातील मोबाईल चॅटिंगमधून उघड झाला वेगळा अँगल.

सोलापूर : फलटणमधील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणावरून सध्या मोठं राजकारण पेटलं आहे. या प्रकरणात भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचं नाव असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या आरोपांना प्रत्युत्तर देताना राज्याचे मंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केलं की, “आम्ही त्या भगिनीचा पूर्ण आदर करतो. मात्र, मोबाईल चॅटिंगमधून जो त्रिकोण (Triangle) समोर आला आहे, तो लोकांसमोर मांडण्यासारखा नाही. त्यामुळे या प्रकरणावर कुणीही राजकारण करू नये.”
गोरे पुढे म्हणाले, “या प्रकरणाचा तपास सुरू असून न्यायालय आरोपींना नक्कीच शिक्षा देईल. मुख्यमंत्र्यांनी स्वतः योग्य निर्देश दिले आहेत. तरीदेखील विरोधक सातत्याने तपास यंत्रणांवर शंका उपस्थित करत आहेत, हे योग्य नाही.”
मोबाईल चॅटिंगमधून उघड झालेला वेगळा अँगल
जयकुमार गोरे यांनी सांगितलं की, “संपदा मुंडे आणि दोन आरोपी यांच्या मोबाईल फोनमधील चॅटिंग तपासल्यानंतर परिस्थिती अत्यंत गंभीर आणि वेगळी दिसत आहे. तिन्ही मोबाईल पाहिल्यानंतर जो त्रिकोण समोर आला आहे, तो अत्यंत भयानक असून तो लोकांसमोर आणण्यासारखा नाही.”
त्यांनी पुढे सांगितलं, “या मृत्यूवर राजकारण करणं थांबवावं. तपास यंत्रणा पुराव्यांच्या आधारे चौकशी करत आहे आणि न्यायालय आरोपींना शिक्षा देईल. आम्ही मृत भगिनीचा आदर करतो, पण तिच्या मृत्यूचा वापर राजकीय फायद्यासाठी करणं अत्यंत चुकीचं आहे.”
रामराजे निंबाळकरांवर अप्रत्यक्ष टीका
गोरे म्हणाले, “काही स्थानिक नेते वस्तुस्थिती बाजूला ठेवून, तिसऱ्याच कोणाचे तरी नाव घेत राजकीय आकांडतांडव करत आहेत. संपदा मुंडेच्या मृत्यूच्या आडून आपले राजकीय पुनर्वसन होईल, अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. जनतेने तुम्हाला 40 वर्षांपासून पाहिलं आहे,” असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी रामराजे निंबाळकर यांना लगावला.
तपास आणि पुरावे
या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज, तसेच तिन्ही मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. काहींनी मृत व्यक्तीच्या हस्ताक्षरावर शंका घेतली असली तरी कुटुंबीयांनी तेच हस्ताक्षर असल्याचं मान्य केलं आहे. या सर्व पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे.
गोरे म्हणाले, “पोलीस वस्तुस्थिती समोर आणण्यास टाळाटाळ करत नाहीत, पण काहीजण त्याचा गैरफायदा घेत घाणेरडे राजकारण करत आहेत. न्यायालय अखेरीस सत्य समोर आणेल आणि आरोपींना शिक्षा मिळेल.”