महाराष्ट्र टीईटी पेपरफुटी प्रकरण : दोषींवर मकोका लावणार – एकनाथ शिंदे

मुंबई : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी आणि सूत्रधारांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असून त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लावण्याचा विचार सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली आहे.
टीईटी परीक्षा होण्याच्या अवघ्या २४ तास आधी पेपरफुटीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. ही परीक्षा राज्यातील १,०२८ केंद्रांवर होणार होती. परीक्षेची नवीन तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे.
तपासादरम्यान भिवंडी परिसरातून तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांनी प्रश्नपत्रिका सुमारे दीड कोटी रुपयांना विकण्याचा कट रचल्याचा संशय आहे. या प्रकरणाचे धागेदोरे दिल्लीपर्यंत पोहोचल्याचेही प्राथमिक तपासात समोर आले आहे.
एकनाथ शिंदे यांनी या घटनेला अत्यंत संतापजनक संबोधत दोषींना कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. राज्य सरकारकडून सखोल चौकशी करण्यात येणार असून पेपरफुटीमागील संपूर्ण रॅकेट उघड करण्यासाठी कठोर पावले उचलली जातील, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणामुळे सुमारे सहा लाख परीक्षार्थ्यांवर परिणाम झाला असून विरोधी पक्षांनीही सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकारने प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास यंत्रणेच्या (SIT) चौकशीचे आदेश दिले आहेत.