2026 लँड रोव्हर डिफेंडरचे अनावरण; नवीन ‘व्हर्टेक्स एडिशन’ची भर
लक्झरी एसयूव्ही निर्माता लँड रोव्हरने 2026 मॉडेल वर्षासाठी डिफेंडरचे अद्ययावत व्हर्जन जागतिक बाजारपेठेत सादर केले आहे. यामध्ये प्रथमच व्हर्टेक्स एडिशनचा समावेश करण्यात आला असून, आकर्षक डिझाइन, नवीन फीचर्स आणि काही यांत्रिक बदलांसह ही एसयूव्ही अधिक आधुनिक बनवण्यात आली आहे.
नवीन व्हर्टेक्स एडिशनला अधिक दमदार लूक देण्यासाठी पुढील आणि मागील बंपरची नव्याने रचना करण्यात आली आहे. याशिवाय मोठी फ्रंट ग्रिल, सुधारित फॉग लॅम्प्स, ग्लॉस ब्लॅक टेलगेट स्पॉयलर, बॉडी-कलर क्लॅडिंग आणि स्पेअर व्हील कव्हर देण्यात आले आहे. या मॉडेलमध्ये 22-इंच सॅटिन डार्क ग्रे अलॉय व्हील्स स्टँडर्ड असून, इतर व्हील पर्यायही उपलब्ध आहेत. तसेच नवीन नामीब ऑरेंज रंगासह अनेक नवीन रंग पर्याय ग्राहकांना मिळणार आहेत.
इंटिरियरमध्ये विंडसर लेदर आणि नवीन फोर्ज्ड टेक्स्टाइल अपहोल्स्ट्रीचा पर्याय देण्यात आला आहे. ही अपहोल्स्ट्री 100 टक्के निटेड पॉलिस्टरपासून तयार करण्यात आली आहे. याशिवाय तीन किंवा चार-झोन क्लायमेट कंट्रोल, एअर क्वालिटी सेन्सर आणि पॉवर सॉकेटसारखी सुविधा देखील उपलब्ध आहे.
2026 डिफेंडर 110 मॉडेलमध्ये आता नवीन सहा-सीटर पर्याय देण्यात आला आहे. पारंपरिक दुसऱ्या रांगेतील बेंच सीटऐवजी दोन स्वतंत्र कॅप्टन सीट्स देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना अधिक आराम, तिसऱ्या रांगेत सहज प्रवेश आणि अतिरिक्त स्टोरेज स्पेस मिळते.
दरम्यान, डिफेंडर ऑक्टा व्हेरियंटमध्येही बदल करण्यात आले आहेत. युरोप आणि काही आंतरराष्ट्रीय बाजारांसाठी 4.4-लिटर ट्विन-टर्बो माइल्ड-हायब्रिड V8 इंजिन नव्या उत्सर्जन नियमांनुसार अपडेट करण्यात आले आहे. त्यामुळे इंजिनची कमाल शक्ती 626 bhp वरून 533 bhp पर्यंत कमी झाली असली तरी 750 Nm टॉर्क कायम ठेवण्यात आला आहे. परिणामी 0 ते 100 किमी/ताशी वेग गाठण्यासाठी आता 4.4 सेकंद लागतात, जे आधीपेक्षा 0.4 सेकंद अधिक आहे.