₹500 कोटींच्या सायबर फसवणुकीचा सूत्रधार पुण्यातून अटक; बनावट बँक खात्यांचे जाळे उघड.
राजस्थान पोलिसांच्या सायबर क्राइम शाखेने देशभर पसरलेल्या तब्बल ₹500 कोटींच्या ऑनलाइन गुंतवणूक फसवणूक प्रकरणाचा मोठा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला महाराष्ट्रातील पुणे येथून अटक करण्यात आली आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी लोकांना कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्यांची आधार, पॅन आणि इतर कागदपत्रे गोळा करत होता. त्यानंतर या कागदपत्रांच्या आधारे विविध बँकांमध्ये “म्यूल अकाउंट्स” (इतरांच्या नावाने उघडलेली बँक खाती) तयार केली जात होती. सायबर फसवणुकीतून मिळालेला पैसा या खात्यांमधून फिरवून त्याचा माग काढणे कठीण केले जात होते.
गुंतवणुकीवर अवास्तव परताव्याचे आमिष दाखवण्यासाठी WhatsApp Group, सोशल मीडिया आणि बनावट ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात येत होता. अनेक नागरिकांनी मोठ्या नफ्याच्या आशेने पैसे गुंतवले; मात्र त्यांची रक्कम या बनावट खात्यांमधून वेगवेगळ्या ठिकाणी वळवण्यात आली.
पोलीस तपासादरम्यान अनेक बँक खाती, मोबाईल फोन, सिम कार्ड, डेबिट कार्ड आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या रॅकेटशी संबंधित इतर आरोपी आणि आर्थिक व्यवहारांचा तपास अद्याप सुरू असून आणखी अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
सायबर तज्ज्ञांच्या मते, अनोळखी गुंतवणूक गट, सोशल मीडियावरील “हाय रिटर्न”च्या ऑफर्स आणि पडताळणी नसलेल्या Trading Apps पासून नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे. कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी संबंधित कंपनीची विश्वासार्हता तपासणे आणि संशयास्पद व्यवहारांची त्वरित सायबर पोलिसांकडे तक्रार करणे हा सुरक्षिततेचा सर्वोत्तम मार्ग आहे.