महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; शेतकऱ्यांना 2 लाख रुपयां पर्यंत कर्जमाफी.
राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र मंत्रिमंडळाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ मंजूर केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या पीककर्जाची दोन लाख रुपयांपर्यंत माफी करण्यात येणार असून, या निर्णयाचा लाभ सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे.
सरकारने यावेळी कर्जफेडीबाबतची महत्त्वाची अटही शिथिल केली आहे. पूर्वी कर्जमाफीसाठी नियमित परतफेडीशी संबंधित काही अटी लागू होत्या. नव्या निर्णयामुळे पात्र शेतकऱ्यांना अधिक सुलभ पद्धतीने कर्जमाफीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच, ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जाची परतफेड केली आहे, त्यांच्यासाठी स्वतंत्र प्रोत्साहनपर लाभ देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनाही योजनेत संधी देण्यात आली आहे. अशा लाभार्थ्यांनी दोन लाख रुपयांवरील थकबाकीची रक्कम भरल्यानंतर त्यांना दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. यासाठी शासनाने 31 मार्च 2027 पर्यंतची मुदत निश्चित केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या योजनेसाठी राज्य सरकारकडून सुमारे 36,585 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून, शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.
या निर्णयामुळे राज्यातील लाखो कर्जबाजारी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या निर्णयामुळे आर्थिक शिस्तीला चालना मिळेल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.