राज ठाकरे यांचा इशारा : “१ तारखेचा मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, महाराष्ट्रातील आग दिल्लीपर्यंत पोहोचली पाहिजे”
मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) पदाधिकारी मेळावा पार पडला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मनसैनिकांना निवडणूक तयारीचा कानमंत्र दिला आणि निवडणूक आयोगासह राज्य व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

“मुख्यमंत्रीपदासाठी किती लाचारी करायची?” – शिंदेंवर थेट टीका
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य करत म्हटलं, “मुख्यमंत्रीपदासाठी किती लाचारी, चाटुगिरी करायची? किती स्वाभिमान गहाण ठेवायचा?”
त्यांनी पुढे उघड केले की महाराष्ट्र सरकारने ‘नमो टुरिझम सेंटर’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे, तोही रायगड, शिवनेरी, राजगड यांसारख्या ऐतिहासिक किल्ल्यांवर. “हे आमच्या महाराजांचे किल्ले आहेत. तिथं फक्त शिवरायांचं नाव असावं, ‘नमो टुरिझम सेंटर’ नव्हे. हे उभारलं तर आम्ही फोडून टाकू,” असा इशाराही त्यांनी दिला.
राज ठाकरे म्हणाले, “मुख्यमंत्रीपदासाठी चाललेली ही चाटुगिरी इतकी खाली गेलीय की कदाचित पंतप्रधानांनाही माहित नसेल.”
मतदार यादीतील घोळांवर हल्लाबोल
राज ठाकरे यांनी राज्यातील मतदार याद्यांतील अनियमितता गंभीर असल्याचं सांगत निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
“मुख्य निवडणूक आयुक्त म्हणतात, सीसीटीव्ही ही प्रायव्हसी आहे! मत देणं प्रायव्हसी असू शकतं, पण मतदार प्रायव्हसी कसा?”
त्यांनी मागणी केली की “आधी मतदार याद्या स्वच्छ करा. निवडणुका आणखी एक वर्ष पुढे ढकला, पण पारदर्शकता आणा. मग पराभव झाला तरी आम्ही स्वीकारू. सध्याचं चित्र म्हणजे मॅच फिक्स आहे.”
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});मोर्चासाठी ‘लोकलने’ येणार राज ठाकरे
राज ठाकरे यांनी १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मोर्चात मुंबईकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले. “मी स्वतः लोकलने मोर्चाला येणार आहे. हा मोर्चा असा झाला पाहिजे की दिल्लीला कळलं पाहिजे – महाराष्ट्रात काय आग पेटली आहे.”
त्यांनी पुढे म्हटलं, “बॉसने सुट्टी दिली नाही तर बॉसच्या गालावर एक मत द्या! तोही मतदार आहे, त्यालाही मोर्चाला घेऊन या.” “बोट ठेवेल ती जागा अदानीला देतात”
राज ठाकरे म्हणाले, “आज राज्यात सत्ता म्हणजे ठराविक लोकांच्या हितासाठी काम करणं झालंय. बोट ठेवेल ती जागा अदानीला दिली जाते. हे थांबवायचं असेल तर मतदारांनी जागं व्हावं.” त्यांनी मतदारांना उद्देशून म्हटलं की निवडणुका पारदर्शक झाल्याशिवाय लोकशाहीचा अर्थ उरत नाही. “पुढारलेल्या देशांतही बॅलेट पेपर वापरतात. हे मी एकटाच नाही, पंतप्रधान मोदीही म्हणाले आहेत,” असं ते म्हणाले.
नवी मुंबई आयुक्तांच्या बंगल्यावर ५५० मतदार?
मतदार याद्यांतील विसंगतींचं उदाहरण देताना राज ठाकरे म्हणाले, “नवी मुंबई आयुक्तांच्या बंगल्यावर ५५० लोकांची नोंदणी आहे. कुणाचा पत्ता सुलभ शौचालय दाखवला आहे! हे काय चाललंय?”
त्यांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या की “निवडणुकांच्या वेळी घराघरांत जाऊन चेहरे ओळखा. कोणाचे मतदान कुठं झालं आहे हे पहा. ही लढाई छोटी नाही , ही महाराष्ट्राच्या भविष्यासाठीची लढाई आहे.”
“महाराष्ट्राने पहिले पाऊल टाकलेच पाहिजे”.
राज ठाकरे यांनी शेवटी विश्वास व्यक्त केला की, “ही लढाई महाराष्ट्राची आहे. मतदारांचा सन्मान आणि निवडणुकांची शुचिता टिकवण्यासाठी महाराष्ट्रच पहिलं पाऊल टाकेल.”
सारांश:
राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यातून आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचं आवाहन केलं, निवडणूक आयोग आणि सरकारवर तिखट शब्दात हल्ला चढवला, तर १ नोव्हेंबरच्या मोर्चातून “मतदारांचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचं” आवाहन केलं.